जमीन विक्रीप्रकरणी तिरुपतीच्या उच्चशिक्षित महिलेला अटक

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : करमाड शिवारातील कोट्यवधीच्या जमिनीचे मूळ मालक हैदराबादचे असल्याने त्यांच्या दाक्षिणात्य नावाशी साधर्म्य असल्याचा फायदा घेत ब्रोकर दाम्पत्याने तिरुपती येथील एका एम.एस्सी. शिक्षित महिलेला तोतया मालक म्हणून उभे केले. दोघांना विक्रीचा सौदा करून तब्बल ७० लाख रुपयांचा गंडा घातला. मूळ मालक पुरुष असतानाही एका महिलेला चक्क सायना रायचुरी नावाचे बनावट आधारकार्ड देऊन उभे केले. अखेर हा हायप्रोफाईल जमीन घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य सूत्रधार पती-पत्नीसह तिरुपतीतून तोतया महिलेला बेड्या ठोकल्या.
 अधिक माहितीनुसार, मूळ जमीन मालक सायन्ना रायचूरी हे हैदराबाद येथील मोठे कंत्राटदार असून, त्यांची जालना रोडला लागून १३ एकर जमीन आहे. त्यांची मुलगी छत्रपती संभाजीनगर येथे राहते. त्यांच्या जमिनीवर डोळा ठेवून ब्रोकर राजू जाधव आणि त्याची पत्नी वैशाली जाधव यांनी फसवणुकीचे जाळे विणले. 
सायन्ना रायचुरी हे पुरुष असतानाही त्यांच्या दाक्षिणात्य नावाशी साधर्म्य दाखवण्यासाठी आरोपींनी तिरुपती येथील उच्चशिक्षित लता ऊर्फ ई. लता सुरेश हिला १३ लाख रुपयांचे आमिष दाखवून शहरात बोलावले. तिच्या नावाने सायन्ना रायचुरी असे बनावट आधारकार्ड तयार केले. आरोपींनी या बनावट ओळखीच्या आधारे संतोष शिवाजी वैद्य आणि मनोज गटकाळ यांच्याशी जमिनीचा सौदा केला. संतोष वैद्य यांच्याकडून ५० लाख रुपये उकळले. खरेदीखत करण्यास टाळाटाळ करण्यात आली. गटकाळ यांच्याकडून २० लाख रुपये घेतले. फिर्यादींनी चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघड झाला.